फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

बुधवार, 2 मार्च 2022 (14:49 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत म्हटले की देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते राज्यात पहायला मिळत आहे. दाऊद इब्राहिमचे सहकारी यांच्यासोबत व्यवहार करून जेलमध्ये मंत्री गेले, नवाब मलिक यांना वाचायला सरकार उभं राहिलं आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला, तसेच देशात असं कधी कधीच घडलं नाही असं म्हणत पोलीस कोठडीत गेल्यानंतरही मंत्री पदावर कायम आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.
 
मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे -
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतला पाहिजे, यासाठी आम्ही सभागृहात संघर्ष करू. आम्हाला चर्चा करायला इंटरेस्ट आहे, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, चर्चा झाली पाहीजे हे आमचे मत आहे. 12 आमदारांना यांनी मागे निलंबित केले, पण यावेळी तशी तानाशाही केली तर आम्हाला विचार करायला लागेल असा इशाराही फडणवीसांनी सरकारला दिला आहे.
 
अजित पवार म्हणाले वीज कनेक्शन कापले जाणार नाही, पण आता कनेक्शन कापले जात आहे, यांना आता आम्ही जाब विचारणार आहोत, हे सावकारी सरकार आहे. आज उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे, गाळप न झालेल्या उसाचा एक मोठा प्रश्न उभा राहत आहे, सरकारने पैसे दिले पाहिजे असं फडणवीस म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत राहिली नाही.
 
छत्रपती घराण्यातल्या लोकांना आज उपोषणाला बसावे लागत आहे हे, याच सरकारमध्ये झालंय. ओबीसींच्या शिष्यवृत्तीचे पैसेही दिले जात नाही. ओबीसींवर या सरकारचा इतका राग का आहे? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय.
 
"नवाब मलिक यांचा राजीनामा न घेऊन एका विशिष्ट समाजला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे" असा आरोप फडणवीसांनी केलाय. तसेच "यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे" अशी टिका त्यांना छगन भुजबळ यांच्यावर केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती