Nagpur News: महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका अॅल्युमिनियम युनिटमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात आठ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये संध्याकाळी ७ वाजता स्फोट झाला, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार स्फोट इतका शक्तिशाली होता की सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत धुराचे लोट दिसत होते. गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही फर्म अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर बनवते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अॅल्युमिनियम पावडरमुळे आग अधिक तीव्र झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी या स्फोटाबद्दल सांगितले आहे की, हा कारखाना नागपूरच्या उमरेड तालुक्यात आहे. कारखान्याच्या पॉलिश केलेल्या ट्यूबिंग युनिटमध्ये स्फोट झाला आहे. अग्निशमन विभाग घटनास्थळी उपस्थित आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे काम करत आहे. त्यांनी सांगितले की, स्फोट झाला तेव्हा एकूण ८७ लोक आत उपस्थित होते. आठ जण जखमी झाल्याचे बातमी आहे.