उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निर्देशाप्रमाणे चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच, आपली भूमिकाही मांडली. मला या विषयावर बोलायचे नव्हते; पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे आहे; पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार आहे. कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येईलच. त्यासाठी एसआयटी चौकशी करावी, असे म्हटले.
महाराष्ट्र अशांत करण्यामागे कोण ते शोधून काढू : मुख्यमंत्री
जरांगेंच्या माध्यमातून आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र अशांत ठेवण्यामागे कोण कोण आहेत, याची एसआयटी चौकशी करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्यावरून विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. सत्ताधा-यांनी आक्रमक भूमिका घेऊन जरांगेच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.