मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरागे पाटील यांनी काल अंतरवाली सराटीत बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांना माझा बळीच हवाय ना तर मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या, असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, राज्य सरकारने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. यानंतर राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद केले आहे.
जरांगे हे अंतरवली सराटी पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबेरी गावात रात्री मुक्कामाला होते. आज सकाळीच जरांगे यांचे तीन समर्थक शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हे सहकारी सक्रीय आहेत. जरांगें यांनी मुंबईला जाण्याचा निर्धार केल्यानंतर हे तिघेही मुंबईला जाण्याच्या तयारीला लागली होते. यामुळेच आज २६ फेब्रुवारी सकाळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
जरांगे सगेसोयरेच्या मागणीवर ठाम
मनोज जरांगे आज मुंबईकडे निघणार होते. मात्र, राज्य सरकारच्यावतीने जालना जिल्हाधिका-यांच्या आदेशाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत जाण्याचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या अधिसूचनेवर ठाम राहणार असल्याचे म्हटले. संचारबंदी उठवल्यानंतर पुन्हा मुंबईकडे सागर बंगल्यावर जाणार असल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले.