पाऊस लांबला तरी जुलैपर्यंत पुरेल इतका आहे हतनूरमध्ये जलसाठा

शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (09:56 IST)
हतनूर धरणातून यंदा रब्बीसाठी तीन आवर्तने दिली गेली. रेल्वे, भुसावळ पालिका व दीपनगर केंद्राला सुद्धा तापी नदीतून एक आवर्तन देण्यात आले आहे. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्के जलसाठा आहे. यामुळे पाऊस लांबला तरीही धरणावर अवलंबून असणारी ११० गावे, शहरे, प्रकल्प, रेल्वे प्रशासन आणि आयुध निर्माणीला टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. सध्या हतनूर धरणात ८९.६ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

हा जलसाठा गतवर्षी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. पण परतीच्या पावसामुळे उशिरापर्यंत आवक सुरू होती, यामुळे धरण १०० टक्के भरले होते. यानंतर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन व तापी नदीतून एक आवर्तन सोडण्यात आले. यामुळे साठा कमी झाला. तरीही तो गतवर्षपिक्षा दीड टक्के जास्त आहे.
 
ही स्थिती पाहता येत्या उन्हाळ्यात हतनूरवर अवलंबून असलेल्या कोणत्याही पाणीवापर संस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागणार नाही. पाऊस लांबला तरी हा साठा केवळ जून नव्हे तर थेट जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत टिकू शकेल, असे असले तरी प्रत्येक पाणीवापर संस्थेने उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने नागरिकांना केले आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती