सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवून देऊ : शरद पवार

बुधवार, 27 जानेवारी 2021 (21:37 IST)
सीमाभागातील बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र आहे, हे दाखवण्याची आता वेळ आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.  महाराष्ट्र शासनाचे सीमाप्रश्न विशेष कार्याधिकारी डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद - संघर्ष व संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सीमावादाच्या लढ्यावर प्रकाश टाकता आला. या कार्यक्रमात पवार बोलत होते.
 
शरद पवार पुढे म्हणाले की, सीमाभागाच्या लढ्यात अनेक टप्पे आले. एका टप्प्यावर निपाणी हा भाग महाराष्ट्राला देऊ केला होता. मात्र सीमाभागातील नागरिकांनी भूमिका घेतली की, सर्वच भाग एकत्रितपणे महाराष्ट्रात सामील व्हावा. त्यामुळे निपाणी महाराष्ट्रात आले नाही. आजही सीमाभागातील नागरिक नोव्हेंबरमधील एक दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रातूनही अनेक भागातील लोक या आंदोलनाला पाठिंबा देत होते. राज्यात महाराष्ट्र एकीकरण समिती गठीत करण्यात आली.
 
इतकी वर्षे एखादी चळवळ सतत शांततापूर्ण पद्धतीने सुरू असल्याचे सीमावाद हे एकमेव उदाहरण आहे. सीमाभागातील बांधवांनी अविरत संघर्ष करून हा लढा सुरू ठेवला. तिथल्या अनेक पिढ्या या लढ्यात उद्ध्वस्त झाल्या, तरीही चळवळीला त्यांनी प्राधान्य दिले. माझ्यासह एस. एम. जोशी, स्व. बाळासाहेब ठाकरे, प्रा. एन. डी. पाटील, छगन भुजबळ असे नेते या समितीत होते. समितीच्या वतीने मीदेखील सीमाभागात जाऊन आंदोलन केले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती