Emergency: बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा का दिला होता?

शनिवार, 26 जून 2021 (18:16 IST)
मयुरेश कोण्णूर
महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 'महाविकास आघाडी'चं सरकार येणं यामागचं न पुसता येणारं एक कारण 46 वर्षांपूर्वी देशात लागलेली आणीबाणी आहे. ती नसती, तर कदाचित शिवसेना आणि काँग्रेसला विरुद्ध ध्रुवांवरच्या राजकीय विचारधारा असून एकत्र येण्याच्या समान धागा सापडणं कठीण होतं.
 
46 वर्षांपूर्वी या दोन्ही पक्षांच्या अगोदरच्या पिढ्यांनी जणू या धाग्याची तजवीज करुन ठेवली होती, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीच्या मुद्यावरुन इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता.
 
जेव्हा काँग्रेस विरुद्ध देश अशी विभागणी झाली होती, संसद स्थगित होऊन सर्व अधिकार एकहाती एकवटले होते, अनेक राजकीय आणि वैचारिक विरोधक तुरुंगात डांबले गेले होते, तेव्हा हा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधींच्या बाजूनं जे मोजकेच उभे होते, त्यात बाळासाहेब आणि शिवसेना होते.
 
धर्मनिरपेक्षता हे मूळ तत्व सोडून काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा कसा देईल अशा मोठ्या राजकीय पेचात सोनिया गांधी असतांना, शरद पवारांनी त्यांना आणीबाणीची आठवण करुन दिली.
 
 
"ज्यावेळेस इंदिरा गांधी यांच्या हाती देशाची सत्ता होती आणि त्यांनी देशात आणीबाणी लावली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते होते ज्यांनी जाहीरपणानं त्यांना पाठिंबा दिला होता. पण बाळासाहेबांनी ज्यावेळेस भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांना निष्ठेनं साथ देणाऱ्या तरुणांची संघटनाही सोबत उभी राहिली. इंदिरा गांधींना पहिला सपोर्ट त्यांनी जाहीरपणानं केला, त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये.
 
नंतरच्या निवडणुकांमध्ये इंदिरा यांना पाठिंबा देऊन एकही उमेदवार उभा करायचा नाही असाही निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे अशी टोकाची भूमिका काँग्रेससाठी घेणारी शिवसेना आणि बाळासाहेब यांच्याबद्दल आपण काही वेगळा विचार करायचा का नाही? हे मी त्यांच्या (सोनिया गांधींच्या) नजरेला आणून दिलं," असं शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं.
 
तो वेगळा विचार झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण इतिहासात डोकावून हा प्रश्न विचारणं भाग पडतं, की काँग्रेसविरुद्ध देशात आणि राज्यात हयातभर आपलं राजकारण उभं केलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला पाठिंबा का दिला होता?
 
बाळासाहेबांच्या या निर्णयाबद्दल, त्यांच्या लिखाणांतून, भाषणांतून, इतरांनी केलेल्या त्याविषयीच्या लेखनातून आणि केलेल्या नोंदीतून विविध कारणं समोर येतात. स्वत: बाळासाहेबांनी नंतरच्या काळात त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्टिकरणं मुलाखतींमध्ये दिली आहेत.
 
अलिकडच्या काळातल्या मुलाखतींमध्ये त्यांनी आपण आणीबाणीला स्पष्ट पाठिंबा कधीही दिला नाही आणि आपली पूर्ण भूमिका, वाक्यं वाचली गेली नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. पण तरीही इतिहासात नोंद त्यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला अशीच झाली आहे.
 
आणीबाणी ही शिस्तपर्वाची सुरुवात
वास्तविक, शिवसेनेची स्थापना ही भूमिपुत्रांच्या, स्थानिकांच्या हक्कांच्या मागणीवरुन झाली होती. तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंही भारावलेला होता.
 
शिवसेनेचा अवतार हा पहिल्यापासून आक्रमक होता. त्यामुळे भूमिपुत्रांच्या मागण्यांसाठी आक्रमक संघटना या चेहऱ्यासोबतच तत्कालिन काँग्रेस सरकारनं मुंबईच्या कामगारविश्वावर कम्युनिस्टांचा असलेला दबदबा मोडून काढण्यासाठी जपलेली संघटना असंही शिवसेनेचं वर्णन केलं गेलं.
 
तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हे विशेषत्वानं झालं. म्हणून आचार्य अत्रेंनी शिवसेनेला 'वसंतसेना' असंही म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसशी असलेली सेनेची जवळीक समोर होती.
 
विविध निवडणुकांत सेनेनं घेतलेल्या भूमिकांचा काँग्रेसच्या राजकीय यशावरही परिणाम होत होता. विशेषत: काँग्रेस नेते रामराव आदिकांच्या निवडणुकीसाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. आदिक जिंकू शकले नाहीत, पण त्यावरुन सेनेचं तेव्हाचं राजकारण समजू शकतं. पण मुंबईच्या राजकारणात शिवसेनेची ताकद वाढत होती.
 
दुसरीकडे अनेक 'राडा' आंदोलनातून सेनेचं दुसरं रुपही समोर येत होतं. सेना-कम्युनिस्ट अशा लढाया जणू रोजच मुंबई पाहात होती. या आक्रमकतेला आळा घालण्याचे आवाज काँग्रेसमध्ये उठत होते. रजनी पटेल त्यात आघाडीवर होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आले होते.
 
त्यामुळे आणीबाणी जाहीर झाल्यावर शिवसेनेवरही बंदी येणार अशा चर्चा होऊ लागल्या. अनेक संघटनांवर तशी बंदी आलीही. 'मार्मिक'च्या छपाईवरही काही काळानं गदा आली. म्हणून शिवसेनेवरच्या दबावाच्या या परिस्थितीत बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला असं म्हटलं गेलं.
 
त्याअगोदर 31 ऑगस्ट 1975 रोजी, म्हणजे आणीबाणी जाहीर झाल्यावर दोन महिन्यांनी, 'मार्मिक'मध्ये आणीबाणीला 'शिस्तपर्व' असं म्हणून निर्णयाचं समर्थन करणारा लेख लिहिला गेला. डॉ. विजय ढवळे यांच्या 'वाघाचे पंजे' या शिवसेनेवरील पुस्तकात या लेखाचा अंश प्रकाशित करण्यात आला आहे.
 
या लेखात म्हटलं गेलं होतं: 'बेताल वर्तनामुळे, विरोधी पक्षांच्या बेशिस्तीमुळे देश भरकटत चालला होता. अराजक माजवण्यासाठीही सांगितले जात होते. लष्कराला चिथावणी दिली गेली होती. इंदिराजींना रशिया छाप राजवट स्थापन करायची नाही असे आम्हाला वाटते. आणीबाणीत सर्वच आलबेल नसले तरीही त्यामुळे विघ्नसंतोषी कारवायांना पायबंद बसला आहे हे नाकारता येणार नाही. शिस्त ही लागलीच पाहिजे. पण ते करत असतांना कुठे अति ताणले तर जात नाही ना, हेसुद्धा कटाक्षाने पाहण्याची गरज आहे. टाळ एका हाताने वाजत नाही, तशी लोकशाहीही एका पक्षाकडून राबवली जाऊ शकत नाही. सरकारवर जास्त जबाबदारी असतेच, पण विरोधकही आपल्या मर्यादा ओळखून वागले तरच लोकशाहीला अर्थ राहील. आमच्या मते, आणीबाणीही शिस्तपर्वाचीच सुरुवात आहे.'
 
अशा प्रकारे आणीबाणीचं समर्थन केलं गेलं होतं.
 
बंदी टाळण्यासाठी पाठिंबा की लोकशाहीपेक्षा ठोकशाही बरी?
इंदिरा गांधींनी अनेकांना तुरुंगात टाकलं होतं आणि अनेक जातीयवादी संघटनांवर बंदी आणली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारसोबत संघर्ष टाळण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला असं मत ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर मांडतात.
 
अकोलकरांनी त्यांच्या पुस्तकात या विषयी लिहितांना असंही नोंदवलं आहे की ज्या दिवशी आणीबाणी घोषित झाली, त्याच दिवशी मनोहर जोशींनी नगरसेवकांची बैठक आयोजित करुन आणीबाणीचा निषेध केला होता, पण ठाकरे यांनी त्याच दिवशी आणीबाणीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.
 
प्रकाश अकोलकर त्यांच्या पुस्तकात लिहितात: "1969 मध्ये दादर परिसरात झालेल्या दंगलीनंतर ठाकरे यांना अटक झाली होती. या अटकेचा त्यांनी भयंकर धसका घेतला होता. आणीबाणीला विरोध करणं म्हणजे तुरुंगात जाऊन बसणं होतं. त्यामुळे अटकेला घाबरुन ठाकरे 'इंदिरा आणि संजय नामाची जपमाळ' ओढण्यास प्रारंभ केला असंही सांगण्यात येतं. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा सेनेवर बंदी येईल आणि आपल्याला अटक होईल, या कल्पनेनं ठाकरे धास्तावले होते, असं त्या काळातले त्यांचे अनेक सहकारी सांगतात."
 
पण सेनेच्या हिताच्या कारणासोबतच बाळासाहेबांनी घेतलेल्या काही भूमिकाही या निर्णयाला कशा जोडल्या गेल्या होत्या याबद्दलही काही विश्लेषकांनी लिहिलं आहे.
 
वैभव पुरंदरे त्यांच्या 'बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय' या पुस्तकात लिहितात: "ठाकरेंनी सुरक्षित पर्याय म्हणून इंदिरा गांधींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असे मानले जात असले तरी या निर्णयाचा एक महत्वाचा पैलू असा आहे की, आणीबाणीला विरोध म्हणजे ठाकरेंनी वेळोवेळी एकाधिकारशाहीचे जे जाहीर समर्थन केले, त्याच्या विरोधात वागणे ठरणार होतं.
 
इंदिरा गांधींनी राजकीय हत्यार म्हणून लागू केलेली आणीबाणी तत्वत: नाकारणे ठाकरेंना शक्य नव्हते. या निर्णयामुळे धोरण ठरविणे आणि निर्णय घेणे हे दोन्ही अधिकार एकाच व्यक्तीच्या हातात एकवटले होते. त्यावर ठाकरेंचा विश्वास होता. 'माझा लोकशाहीवर विश्वास नाही, माझा ठोकशाहीवर विश्वास आहे' असे ठाकरे अनेकदा म्हणत."
 
आणीबाणीत स्वाभिमान गहाण टाकला नव्हता!
आणीबाणीच्या काळात घेतलेल्या भूमिकेबद्दल बाळासाहेब नंतर विविध व्यासपीठांवर बोलले. दर कालांतराने अधिक तपशील त्यांच्या बाजूनं ते देत राहिले. 1982 साली मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत या निर्णयाबद्दल ते भाषणात बोलले. त्यावेळेस शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस हे दोघेही व्यासपीठावर होते. प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या पुस्तकात 'नवाकाळ' या वृत्तपत्रात ठाकरेंच्या भाषणाचा आलेला वृत्तांत दिला आहे.
 
त्यानुसार या सभेत बाळासाहेब म्हणाले, "आणीबाणीत आम्ही इंदिरा काँग्रेसची साथ केली होती ती आम्हाला गजाआड जावे लागेल म्हणून नव्हे, हे आम्ही आज येथे स्पष्ट करतो. आणीबाणीत शिवसेनेवर संकट जरुर आले होते, कारण त्यावेळी आमच्या बोडक्यावर शंकरराव (चव्हाण) बसले होते. मी त्यावेळेस दाढदुखीच्या विखाराने आजारी अवस्थेत जसलोकमध्ये पडलो होतो. तोंडातून रक्तस्राव होत होता म्हणून कापसाचा बोळा कोंबला होता, त्यामुळे बोलणेही कमी झाले होते."
 
"अशा अवस्थेत रजनी पटेल यांनी टाईप केलेले एक स्टेटमेंट माझ्याकडे आले आणि त्यावर सही मागितली गेली. त्यात रजनी पटेल यांनी स्वत: दोन ओळी घातल्या होत्या. मी सांगितलं की मी त्यावर सही करणार नाही. हा रजनी पटेल कोण लागून गेला आहे? त्यावर डॉ. मेहता म्हणाले, की तुम्ही जर सही करत नसाल तर सेनेचे पुढारी गजाआड जातील.
 
"मी सरळ सांगितले, की तसे झाले तर रजनी पटेलांना सांगा, की तुमची अंत्ययात्रा निघाल्याशिवाय राहणार नाही. म्हणे सही केली नाही तर सेनेवर बंदी आणल्याशिवाय राहणार नाही. आणीबाणीतही स्वाभिमान गहाण टाकला नव्हता. इंदिरा राजवटीचा आमचा अभ्यास चालला होता. जनता पार्टीचा फटका मिळाल्यावर तरी इंदिरा काँग्रेसमध्ये काही सुधारणा होईल असं वाटलं होतं, पण काही नाही."
 
इंदिरा गांधींनी स्वत: शिवसेनेच्या नावावर काट मारली
पुढे नंतर अनेक मुलाखतींमध्येही बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या आणीबाणी काळात घेतलेल्या भूमिकेबद्दल अनेकदा विचारण्यात आले. त्यात त्यांनी जे म्हटलं ते पूर्णपणे समजून न घेतल्याचंही म्हटले. 2007 मध्ये शेखर गुप्ता यांनी 'एनडीटिव्ही' साठी त्यांची मुलाखत घेतली होती, जी नंतर 'लोकसत्ता'मध्ये प्रकाशित झाली होती. त्यात बाळासाहेबांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे आणि इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी झालेल्या भेटीबद्दलही सांगितलं आहे. शिवसेनेवर बंदी घालण्याचा त्यांना मानस नव्हता हेही ठाकरे सांगतात.
 
बाळासाहेब या मुलाखतीत म्हणतात, "मी असं म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय जर राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचे समर्थन करेन. मात्र स्वत:ची खुर्ची टिकविण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकूमशाहीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो, असे मी म्हणालो होतो.
 
"प्रसारमाध्यमांवर बंदी घालणे हा टोकाचा निर्णय होता, अत्यंत वाईट. हा निर्णय मला अजिबात आवडला नाही. मला वाटतं याच क्षणी त्यांची राजकारणावरची पकड सुटू लागली. म्हणूनच त्या पुढची निवडणूक हरल्या. नाही तर राजनारायण यांच्यात असं काय होतं? महाबावळट माणूस होता तो"
 
इंदिरा आणि संजय गांधी यांच्या भेटीबद्दल ते सांगतात, "आणीबाणी हा त्या भेटीचा विषय नव्हता. तत्कालीन क्रीडामंत्री बुटासिंग यांनी मला फोन करून संजय गांधींची तुम्हाला भेटायची इच्छा आहे, असे सांगितले होते. जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला रजनी पटेलांबद्दल प्रश्न विचारले. मी सांगितले, की त्यांचे काहीच 'वजन' नाही. मग शिवसेनेवर बंदी आणण्याचा तुमचा विचार आहे, हे खरे का, असे मी त्यांना विचारले. त्यावर 'नाही. कोणी सांगितले तुम्हाला?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
 
"इंदिरा गांधींकडे ज्या संघटनांवर बंदी घालायची आहे, अशा संघटनांची यादी होती. काही मुस्लीम संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा त्यात समावेश होता. शिवसेनेचे त्या यादीत तिसरे नाव होते. त्यांनी त्या नावावर काट मारली आणि विचारले, हे नाव यात कोणी घातले? मी त्यांनी बोलाविले म्हणून गेलो होतो, स्वत:हून नाही."
 
पुढे पत्रकार निखिल वागळे यांना दिलेल्या मुलाखतीतही आणीबाणीतल्या भूमिकेबद्दल बोलतांना बाळासाहेब म्हणाले, "त्यावेळेला देशामध्ये संप, मोर्चे, ब्रेकडाऊन स्ट्राईक्स असा सगळीकडे माहोल तयार झाला. कुठेतरी त्यावर काबू यायला हवा की नको? सामान्य जनता भरडली जात होती. 'बेस्ट'चा संप, रेल्वेचे संप असं सुरु होतो. मग बाईंनी ती आणीबाणी आणली. त्या आणीबाणीवर मी बोललेलो आहे. ते छापून आलेलं आहे.
 
"पण तुम्ही वृत्तपत्रवाले, मीडियावाले तुमच्या सोयीचं वाक्य तेवढं वापरता आणि दुसरं उडवून लावता. मी काय बोललो होतो, तर, 'ही आणीबाणी जर इंदिरा गांधींनी देशहितासाठी आणली असेल तर माझा संपूर्ण पाठिंबा आहे. पण स्वत:ची खुर्ची मजबूत करण्याकरता जर ती आणली असेल तर मी त्याचा तीव्र निषेध करतो.' हे पुढंचं वाक्य काढलं, वरचं तेवढं ठेवलं. त्याच्यावर हाणता तुम्ही अजून मला इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता म्हणून."
 
अर्थात हा सगळा चाळीस वर्षांपूर्वीचाही इतिहास आहे. त्यांच्या भूमिकेचा, काँग्रेससोबतच्या कथित सलगीचा राजकीय फायदा सेनेला कसा झाला याबद्दल मतमतांतरं आहेत. पण सेनेवर बंदी आली नाही. काँग्रेसच्या जवळ ते अजून काही काळ राहिले आणि 1980 च्या निवडणुकीत शिवसेनेनं उमेदवार दिले नाहीत. तो एक मोठा निर्णय होता.
 
पण नंतर काहीच काळात बाळासाहेब इंदिरा काँग्रेसपासून दूर गेले आणि 1985पासून त्यांनी 'हिंदुत्वा'चा मुद्दा हाती धरला. लवकरच सेना भाजपाच्या जवळ गेली. पण त्यानंतरही आणीबाणीतल्या भूमिकेचे पडसाद उमटत राहिले. ते एवढे की, चार दशकांनी त्या भूमिकेची आठवण करुन दिल्यानं काँग्रेसनं सेनेला पाठिंबा दिला आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती