डाॅ. शीतल आमटे यांनी आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, तपासात माहिती उघड

गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (08:26 IST)
महारोगी सेवा समितीच्या सीईओ डाॅ. शीतल आमटे-करजगी यांनी जून २०२० मध्ये झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. इतकेच नव्हे, तर डाॅ. शीतल आमटे या काही वर्षांपासून मानसिक तणावात होत्या. त्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वीपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत असल्याची बाबही निष्पन्न झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
२१ नोव्हेंबर २०२० रोजी डाॅ. शीतल यांनी त्यांच्या नेहमीच्या फार्मसिस्टकडे प्राणघातक लेथल इंजेक्शन विषयी विचारणा केली होती. काही कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित आहे. त्यांना वाचविण्यात काही अर्थ नाही, असे कारण देत तीन प्रकारचे प्रत्येकी पाच इंजेक्शन मागविले होते. वास्तविक, आनंदवनातील रुग्णालयात अशा प्रकारचे इंजेक्शन सामान्यत: वापरले जात नाही, याकडेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी लक्ष वेधले.
 
घटनास्थळावरून एका इंजेक्शन चे ॲम्पोल फुटलेल्या स्थितीत आढळले. तसेच वापरलेली सिरींजही मिळून आली होती. मात्र सुसाईड नोट आढळली नाही, ही बाबही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केली. शवविच्छेदन अहवालानुसार डाॅ. शीतल यांचा मृत्यू श्वास रोखल्यामुळे झाल्याचेही पोलीस अधीक्षक साळवे यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांच्या उजव्या हातावर इंटरावेनस इंजेक्शनचे व्रण होते. तपासात घातपात झाल्याबाबतचा कोणताही सकृतदर्शनी पुरावा आढळून आला नसल्याचेही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी यावेळी सांगितले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती