मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत. शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या तथा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून ठळक ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी २८ जुलै २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर दिली.
तेव्हापासून सुषमा अंधारे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडताना बंडखोर शिंदे गटावर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसेच सरकारच्या योजनांची चिरफाड करताना लाव रे तो व्हिडीओ म्हणत सत्ताधाऱ्यांची कोंडीही करतायेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळे बडे नेते गेलेले असताना अंधारे यांनी ठाकरेंची बाजू लावून धरली. अल्पावधीतच त्यांनी ठाकरेंचा विश्वास संपादन केला. सध्या ठाकरे गटाच्या बड्या नेत्या म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे.