मागील आठ दिवस धुवांधार पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण यंदा जुलैमध्येच 85 टक्के भरले आहे. जुलैचा ग्राफ पूर्ण झाला असून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (गुरुवारी) दुपारी 4 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
पवना धरणाच्या खालील बाजुस नदीतीराकडील सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहावे. नदी तीरावरील जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी. जेणेकरून कुठलीही जिवीत व वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
एमपीसी न्यूजशी बोलताना पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, ”पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा आहे. यंदा जुलैमध्येच धरण 85 टक्के भरले आहे. कोणत्या महिन्यात किती टक्के पाणी झाल्यावर पाण्याचा विसर्ग करायचा याचा ग्राफ असतो. जुलै महिन्यात 85 टक्के, ऑगस्टमध्ये 95 टक्के पाणीसाठा झाला. तर, धरणातून विसर्ग केला जातो. जुलैमध्ये 85 टक्के पाणीसाठा झाल्याने जुलैचा ग्राफ पूर्ण झाला आहे. त्यानुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दक्षता म्हणून थोडे पाणी सोडावे लागत आहे”.