प्रियकराने व्हीडिओ क्लिप काढून केलं ब्लॅकमेल?

गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (17:21 IST)
डोंबिवलीत 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या 29 आरोपींपैकी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. उरलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
 
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यात वाढणाऱ्या महिला अत्याचाराच्या मुद्यावर भाजपने महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
 
डोंबिवलीची घटना काय आहे?
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर जानेवारी महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत गेले आठ-नऊ महिने बलात्कार करण्यात येत होता.
 
बलात्कार करणारी मुलं ओळखीची आणि मित्र असल्याची माहिती पीडित मुलीने दिल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
सामूहिक बलात्काराच्या या घटनेबाबत बीबीसीशी बोलताना ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे म्हणाले, "मुलीच्या तक्रारीनुसार तिच्यावर डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाड यासारख्या ठिकाणी चार-पाच वेळा बलात्कार करण्यात आला."
 
पोलिसांच्या सांगण्यानुसार, पिडीत मुलीने 29 मुलांविरोधात बलात्काराची तक्रार दिलीये.
 
ते पुढे सांगतात, "पिडीत मुलगी 15 वर्षांची असल्याने पोलिसांनी पॉस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 23 आरोपींना अटक करण्यात आलीये. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलं आहेत."
 
प्रियकराने व्हीडिओ क्लिप काढून केलं ब्लॅकमेल?
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तिच्या प्रियकराने तिची एक व्हाडिओ क्लिप काढल्याचं म्हटलंय.
 
अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे पुढे म्हणाले, "या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गोष्टींची शहानीशा करण्यात येत आहे."
 
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्पेशल इनव्हेस्टिगेटींग टीम बनवली आहे. महिला अधिकाऱ्याकडे या घटनेचा तपास देण्यात आलाय.
 
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.
 
घटना संतापजनक- देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं.महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत, असं ट्वीट विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
 
"डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे," असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
महिला अत्याचाराच्या मुद्यावर राजकारण
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर भाजपने महिला अत्याचाराचा मुद्दा उचलून धरला होता.
 
भाजपच्या महिला आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून महिला अत्याचाराबाबत निवेदन दिलं होतं.
 
त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून महिला अत्याचाराबाबत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची सूचना दिली होती.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी, महिलांवर वाढते अत्याचार आणि हत्या हा राष्ट्रव्यापी विषय असून त्यावर देश पातळीवर चर्चा व्हायला हवी, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं.
 
"महाराष्ट्रात आणि मुंबईत गेल्या काही दिवसांत महिलांवर, लहान मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत आहेत. ज्या ज्या वेळी आम्ही या घटनांवर बोलतो, त्यावेळेस म्हटलं जातं की भाजप राजकारण करतं. आमचं काम आहे. तुम्हाला प्रश्न विचारणं. एकदा नाही, शंभरवेळा विचारू आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील," असं वक्तव्यं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.
 
"महिला आयोगाला अध्यक्ष नसणं, शक्तिकायदा अंमलात न येणं किंवा अशाप्रकारे संवेदनशील पत्राला (राज्यपालांच्या पत्राकडे चित्रा वाघ यांचा रोख होता) ज्या पद्धतीनं उत्तर दिलं गेलं, त्या पत्रात वेगवेगळ्या राज्यांची आकडेवारी दिली गेली. पण मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट माहीत आहे का," असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.
 
त्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीसुद्धा मागणी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती