धाराशिव : धाराशिव शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, व्यवस्थापक दिपक देवकते, संचालक मंडळ व कर्मचा-यांनी संगणमत करून कार्यकर्ते, नातेवाईक, त्यांच्या संस्थेतील कर्मचा-यांचे बनावट फर्म बनवून पुरेशे तारण न घेता लाखो रूपयांचे कर्ज वाटप केले. काही कर्जदारांना तर लाखो रूपयांचे ओव्हर ड्राफ दिले. जवळच्या जवळपास 200 लोकांना लाखो रूपयांचे कर्ज वाटले. काही कर्जदारांच्या कर्जाची रक्कम बचत खात्यावर जमा होताच, त्याच क्षणी व त्याच दिवशी चेअरमन दंडनाईक यांच्या बचत खात्यावर सर्व कर्जाची रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जाची रक्कम ९ वर्षाचा कालावधी लोटला तरी वसूल केली नाही. रिझर्व्ह बँकेने केलेल्या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी दिसून आल्याने वसंतदादा बँकेचा बँकींग परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला. परिणामी वसंतदादा बँकेचे मोठे ठेवीदार अडचणीत आले. ठेवी मिळणार नाहीत, याचा अंदाज आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चेअरमनसह व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचा-यांवर 27 जुलै रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.