धाराशिव :लैंगिक अत्याचार प्रकरणी एका आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (08:31 IST)
तुळजापूर तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी आणि 32 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली तसेच एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे यांनी दिला.
 
तुळजापूर तालुक्यात गाजलेल्या या प्रकरणाची माहिती अशी की, 27 जानेवारी 2021 रोजी एका गावातील एक अल्पवयीन मुलगी मैत्रिणीकडे वही देण्यासाठी गेली असता, एका तरुणाने फूस लावून पळवून नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
 
याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके, मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे आणि आनंद शिवाजी घोडके या तीन जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये भादंवि 376, 341, 342 , 34 सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या कलम 4,6,8,16,17 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. शहा व एस.बी. मोटे यांनी केला होता.
 
या प्रकरणात आनंद शिवाजी घोडके याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आले होते आणि सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके व मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे यांच्याविरुद्ध दोषारोप सादर केले होते.
 
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगताप यांच्यासमोर झाली , सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक आर. एस. म्हेत्रे यांनी कामकाज पहिले. सदर प्रकरणात पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
 
सदर प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे यांच्यासमोर झाला. सदर प्रकरणात आलेला ठोस पुरावा आणि पीडितीही सुसंगत साक्ष व विशेष अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून, आरोपी सागर उर्फ लक्ष्मण संपत घोडके यास 20 वर्षे सक्तमजुरी आणि 32 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच मुकेश उर्फ भैय्या भगवान भोरे याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
 
हे प्रकरण घडल्यानंतर पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून त्या गावात  मोर्चा काढण्यात आला होता तसेच धाराशिव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी पीडित मुलीची भेट घेऊन , आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे तुळजापूर तालुक्याचे लक्ष वेधले होते.
 


Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती