देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या भेटीला, भाजपच्या गोटात काय सुरू आहे?

मंगळवार, 28 जून 2022 (22:33 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राजभवनात पोहोचले आहेत. आज दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत.
 
देवेंद्र फडणवीस आज दिवसभर दिल्लीत होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी खलबतं केली आणि ते मुंबईला परतले. त्यानंतर ते इतर नेत्यांबरोबर राजभवनात पोहोचले आहेत.
 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
 
एकनाथ शिंदेंनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर भाजपा नेते वेट अँड वॉच मोडवर असल्याचं सातत्याने सांगत होते. त्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे.
 
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "या राजकीय नाट्यात काहीतरी कृतिशील भूमिका घेतली पाहिजे यातून त्यांनी हे पाऊल उचललं असावं. तसंच या राजकीय घडामोडीत विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हा प्रश्न उपस्थित झाला असता. त्यामुळे भाजप नेते भेटायला गेले असावेत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती