पुन्हा देवेंद्र फडणवीस यशस्वी नीती ,शेवटच्या क्षणी भाजपने बाजी मारून आपला पाचवा उमेदवार निवडून आणला

मंगळवार, 21 जून 2022 (07:55 IST)
विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाला असून ही लढतसुद्धा राज्यसभेप्रमाणे चुरशीची झाली. या निकालात महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपचे ५ उमेदवार निवडून आलेत. पुन्हा एकदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली आहे. शेवटच्या क्षणी भाजपने बाजी मारून आपला पाचवा उमेदवार निवडून आणला. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झालेत. दरम्यान, काँग्रेस उमेदवारानेच काँग्रेसच्या उमेदवाराचा गेम केल्याची चर्चा आहे.
 
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेत विधान परिषदेसाठी विशेष कष्ट घेतले होते. राज्यसभेच्या निकालानंतर भाजपाचा आत्मविश्वास वाढला होता. निवडणूकीत मविआ आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत झाली. मविआचे सहा तर भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता होती. त्यातच काँग्रेसने भाजपच्या दोन मतदारांवर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला उशिरा झाला होता. पण शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्षाचे दहावे उमेदवार प्रसाद लाड हे विधानपरिषदेवर निवडून आले.
 
विधानपरिषदेच्या निकालाची सुरवात राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजपचे राम शिंदे यांच्या विजयी निकालाने झाली. त्यानंतर प्रविण दरेकर, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या भाजपच्या,तर शिवसेनेच्या आमश्या पाडवी, सचिन अहीर, तसेच राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचे विजयी निकाल जाहीर झाले.
 
शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे प्रसाद लाड आणि कॉंग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरशी पहायला मिळाली. पण शेवटी प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत.तर धक्कादायक म्हणजे काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले मात्र, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती