“शतकोत्तर रौप्यमहोत्सवी’चे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांसाठी थांबविले

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:37 IST)
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव महापालिकेकडून साजरा केला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असली, तरी फक्‍त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने या महोत्सवाचे उद्‌घाटन थांबले आहे. दरम्यान, या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 12 ऑगस्टची वेळ देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याला अजून दुजोरा देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
 
यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून या वर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्या निधीतून वेगवेगळे 17 उपक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात 2 विश्‍वविक्रमही केले जाणार आहेत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. त्यातच गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असल्याने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच या महोत्सवाचे उद्‌घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडेही घातले आहे. मात्र, अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना 12 ऑगस्टला उद्‌घाटनासाठी येण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, त्याला अजून मुख्यमंत्री कार्यालयाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करावे, की नाही? याबाबत प्रशासन तसेच पदाधिकारीही संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या महोत्सव उद्‌घाटनाचा आढावा घेण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी रात्री उशिरा महापौर बंगल्यावर बैठक बोलाविली होती.

वेबदुनिया वर वाचा