शेतकऱ्याशी संवादासाठी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना

शुक्रवार, 9 जून 2017 (22:24 IST)

शेतकरी संपाची  दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली असून हा गट राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांशी पाठीशी राहील. शेतकरी संकटात आहे, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिगटात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष महाजन आणि शिवसेनेचे दिवाकर रावते (परिवहनमंत्री) यांचा समावेश आहे. हा गट राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी सर्व मागण्या, सूचना यावर चर्चा करेल. आणि त्यांचा अहवाल सादर करेल. कोणताही प्रश्न संवादानेच सुटू शकतो, असा आपला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा