मुंबई – भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे या दौऱ्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली. यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौरा करणार असून, आज दुपारी एक वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील माघारीनंतर फडणवीस याचा हा दौरा होत असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिल्ली दौऱ्यामध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली. भाजप अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता भाजपाच्या माघारीमुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.