शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीवर केलेल्या आरोंपाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत नोटीसीबाबत माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या पत्नीवरबिनबुडाचे आरोप केले होते. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागावी, त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर याप्रकरणी आपण कायदेशीर कारवाई करणार असून न्यायालयात जाणार असल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंल आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादानंतर सामनाच्या अग्रलेखात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवत टोला लगावला होता. या पत्रात संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीवरील पीएमसी बँक घोटाळ्यावर बोट ठेवण्यात आलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. ' मला ईडीचा अनुभव नाही, ईडीचा अनुभव येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केल्यावर ईडीचा अनुभव येतो. पीएमसी बँक घोटाळ्यातील पन्नास लाख रुपये तुमच्या पत्नीला मिळाले, यानंतर ईडीने नोटीस बजावल्यावर तुम्ही हैराण झाला होता. बरीच धावपळ करुन, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलात.