ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. दीपाली सय्यद यांनी एक सूचक विधान केलं असून त्या शिंदे गटात सहभागी होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी दीपाली सय्यद खूप प्रयत्न करत होत्या. पण पक्षात सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून त्या फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत.
"प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल" असं सूचक विधान दीपाली सय्यद यांनी यावेळी केलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असं विचारण्यात आलं असता मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं. अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून फारशा सक्रीय झालेल्या नाहीत. याचं नेमकं कारण विचारण्यात आलं असता "मी स्क्रीनवर येऊन तू-तू मै-मै करत नाही. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली" असं म्हटलं आहे.
"शिवसेनेत काम करताना मला साडेतीन वर्ष झाली"
तुम्ही सध्या शांत का आहात? असं विचारण्यात आलं असता त्यांनी "सुषमाताई नुकत्याच आल्या असून त्यांना आपण शिवसेनेत आल्याचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. शिवसेनेत काम करताना मला आता साडेतीन वर्ष झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या तरच तुम्ही राजकारणात सक्रीय आहात असा समज करण्याची गरज नाही. कामंही केली पाहिजेत. जी लोक कामं करतात त्यांना पाठिंबा दिला तरच ती पूर्ण होतात" असं सांगितलं.