राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय एवढे दिवस जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिली. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय बुधवारी कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.