जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी" - सुषमा अंधारेंचा टोला

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (20:30 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या व्हिडीओवरुन विरोधकांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
 
एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बसल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षाच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
 
काय आहे व्हायरल व्हिडिओत ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरश महाजन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे सर्व नेते एकाच वाहनातून प्रवास करत असल्याचं त्या व्हिडीओत दिसत आहे. गाडीत बसताना नेत्यांना दाटीवाटीने बसावं लागले. त्यावेळचा व्हिडीओ गाडीच्या चालकाने काढला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
 
अजित पवार आणि इतर नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील विरोधकांनी हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ पोस्ट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडूनही सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. यासाठीच पक्ष फोडला का? अशी टीका अजित पवारांवर करण्यात आली. "जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी", असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केलेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती