भाजपाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघा विरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला.त्यावर हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांनी अमन चड्डा आण् त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली आहे.