मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही : मुख्यमंत्री

बुधवार, 16 डिसेंबर 2020 (08:14 IST)
“मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले. रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते विधानसभेत बोलत होते. 
 
विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काहीही करू शकणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवारांची इच्छा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. मेट्रो प्रकल्पात मिठागराचा खडा न टाकण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
 
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेलं नाही. ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती