’बायकोला हवं तरी काय'ला प्रेक्षकांची पसंती

मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (17:47 IST)
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रादेशिक भाषेतील दर्जेदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन येणाऱ्या एमएक्स प्लेअरने प्रेक्षकांना दिलेले गुणवत्तेचे आश्वासन कायमच जपले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेक्षकांनी 'बायकोला हवं तरी काय' या वेबसिरीजला दिलेली पसंती. प्रत्येक स्त्रीच्या मनात असलेल्या या सुप्त इच्छेला अगदी हलक्या-फुलक्या विनोदी स्वरूपात या सिरीजमध्ये मांडण्यात आले आहे आणि म्हणूनच 'बायकोला हवं तरी काय' प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. 
 
एका सर्वसामान्य नवऱ्याची (अनिकेत विश्वासराव) सर्वसामान्य बायको (श्रेया बुगडे) यांच्या भोवती ही कथा फिरते. ही गृहिणी आपल्या भक्तीने भगवान श्रीकृष्णाला (निखिल रत्नपारखी) प्रसन्न करते आणि या बदल्यात श्रीकृष्ण तिला वर मागण्यास सांगतो. तेव्हा आपल्या नवऱ्याला अपग्रेड करण्याची इच्छा ती देवासमोर व्यक्त करते. त्यातूनच पुढे धमाल सुरु होते. 
 
बॉलिवूड आणि इतर माध्यमांमधून कृष्णाचे दर्शन झाल्यानंतर आता हा मराठमोळा कृष्ण तुमच्या भेटीला आला आहे. मात्र हा कृष्ण फिल्मी नसून तो तुमच्याआमच्या सारखा सर्वसामान्य आहे. जो प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटेल. 
 
'बायकोला हवं तरी काय' बद्दल दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव सांगतात, ''बायकोला नक्की काय हवं असतं, याचं उत्तर केवळ तीच सांगू शकते. आजतागायत न सापडलेले हे उत्तर कदाचित या वेबसिरीजच्या माध्यमातून मिळू शकेल.''
तर आपल्या भूमिकेबद्दल निखिल रत्नपारखी सांगतात, '' वेबसिरीजच्या निमित्ताने मला देव बनण्याची संधी मिळाली आणि फक्त देवच नाही तर या एकाच सिरीजमध्ये मला अनेक व्यतिरेखा साकारायला मिळाल्या. याहून सुखावह काय असू शकेल? प्रियदर्शन, अनिकेत आणि श्रेया यांच्याबरोबर काम करायलाही खूप धमाल आली.''
 
प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असलेली ही वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर विनामूल्य उपलब्ध आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती