मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरपावसात महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळये गावात पाहणी केली. उद्धव ठाकरे यांनी तळये गावाला भेट देऊन पाहणी केली. अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही धोकादायक गावांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
तळीये गावातील प्रकार अचानक घडला असून हे सगळं प्रचंड वेदनादायी आहे याची कल्पना करु शकत नाही असे वडेट्टीवार म्हणाले. अशा गावांचा आढावा घेऊन गावांचं पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. या सगळ्यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं आहे. भविष्यात आपल्याला निसर्गाची काळजी घ्यावी लागेल तसंच धोकादायक गावांचं पुनर्वसन करणार, महिनाभरात त्याबाबत नवं धोरण आणलं जाईल, अशी घोषणाही यावेळी वडेट्टीवार यांनी केलीय.
मुख्यमंत्री या गावाची पाहणी करत असतानाच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं, "ज्यांचं नुकसान झालं त्यांना व्यवस्थित भरपाई दिली जाईल. याच्यापुढे अशा घटना घडू नयेत, घडल्या तर जीवितहानी होऊ नये अशाप्रकारच्या उपाययोजना सरकार करत आहे." ते पुढे म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक ती मदत मिळत आहे. बऱ्याचं ठिकाणचं स्थलांतर झालं आहे. अजून जिथं आवश्यकता आहे, तिथल्या नागरिकांचं स्थलांतर करू."
रायगडमधील दरड कोसळल्याच्या दोन घटनांमधील मृतांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महाड तालुक्यातील तळये गावावर कोसळलेल्या दरडीखाली तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी व्यक्त केलीय. बचावकार्य अद्याप सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तर दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या 35 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये काल (23 जुलै) संध्याकाळपर्यंत एकूण 136 जणांचा मृत्यू झाला आहे.