राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आझाद मैदानावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांना उद्देशून मोठे वक्तव्य केले. उद्धव ठाकरे यांनी अंगणवाडी सेविकांचा प्रश्न हा गंभीर आहे असे म्हटले आहे.
मी आज तुमच्यासमोर, तुमच्याबरोबर तुमचा भाऊ म्हणून आलो आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी मोर्चात भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. त्या निमित्ताने हा मोर्चा मुंबईत आला आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच महायुती सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. या सरकारपेक्षा खेकडा बरा असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, सावित्रीच्या लेकी आज इथे आलेल्या आहेत. पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण करतोय त्यांच्या ज्योती तुमच्यात तेवतात की नाही हा प्रश्न आहे. असंख्य ज्योती एकत्र आल्या की त्याची मशाल पेटते. ती मशाल कुणाचीही सत्ता जाळून खाक करू शकते. तुमच्या हातांमध्ये ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात त्यांनी टाळ्या वाजवल्यावर इतका आवाज येतो हा आवाज सरकारच्या कानाखाली मारली तर केवढा मोठा येईल? आताचे जे काही सरकार झाले आहे त्यांच्यापेक्षा खेकडा बरा इतके हे सरकार तिरके आहे. आम्हाला तिघाडा सरकार म्हणत होते.