अभिनेत्री केतकी चितळेची 'ही' मागणी न्यायालयाने केली मान्य

सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (21:24 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि विद्यार्थी निखिल भामरे या दोघांची त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी दाखल गुन्हे एकत्रित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली. केतकीविरोधात राज्याच्या विविध भागांत २२ गुन्हे, तर भामरेविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे.
 
केतकी आणि भामरे यांना त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवणाऱ्यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. त्यामुळे केतकी आणि भामरे या दोघांनी त्यांची अटक बेकायदा ठरवून नुकसानभरपाईसह केलेल्या अन्य मागण्यांवरही न्यायालयाने राज्य सरकार आणि प्रकरणांतील तक्रारदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
 
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची दखल घेऊन केतकी आणि भामरेविरोधातील गुन्हे एकत्रित केले. एकाच व्यक्तीवर एकाच कृतीसाठी एकापेक्षा अधिक गुन्हे नोंदवले गेले असल्यास पहिला गुन्हा मुख्य मानला जावा आणि अन्य गुन्हे त्यासोबत एकत्रित केले जावे. त्याचा भाग म्हणून पहिल्या गुन्ह्यातील साक्षीपुरावा अन्य गुन्ह्यांतही ग्राह्य धरला जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती