पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आज 61 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. गेल्या 15 दिवसांपासून निगडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या न थांबता सतत कार्यरत आहेत. शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील प्रमुख विद्युत दाहिणींवर पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे विद्युतदाहिनी मध्येच बंद पडण्याचा प्रकार सध्या घडत आहे. त्यामुळे मृतदेहाला सुद्धा अंत्यविधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या कठीण काळात परगावाहून अंतविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशानभूमीत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते मदत करत आहेत.
गेल्या 15 दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीचे अक्षरशः तांडव सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण शहरात उपचारासाठी धावाधाव करीत आहेत. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रुग्णालयाबाहेर मिळेल त्या ठिकाणी रुग्ण तात्पुरता इलाज होईल या आशेने पडून आहेत. रुग्णालयात डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा, यामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. अनेक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहेत.त्यातील अनेक जण मृत्यूचे मार्गक्रमण करीत आहेत. दररोज मृतांचा आकडा आता वाढत आहे.