पूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार

बुधवार, 15 फेब्रुवारी 2023 (08:48 IST)
येत्या काही दिवसांमध्ये राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंडळाने कॉपी प्रकरणावर नियंत्रण मिळवून परीक्षांतर्गत गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या दरम्यान पेपरफुटी होऊ नये, म्हणूनही राज्य मंडळाने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये 'कॉपीमुक्त अभियान' राबवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण केले.
 
या अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच, राज्याचे 'नोडल अधिकारी' म्हणून शिक्षण आयुक्त यांना व प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच 'समन्वयक अधिकारी' म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. तसेच हे अभिनय राबवण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करून यासंदर्भात एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी, अशा सूचाना देण्यात आल्या आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती