माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे.
डॉ. अजय डवले यांनी याप्रकरणी पोलिसांकडेही तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन वजा तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्र काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली होती.