काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (17:29 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले. काँग्रेस नेते परदेशात भारताचा अपमान करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अमेरिकेत केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार राहुल गांधी यांच्यावर मोदींनी हल्लाबोल केला. 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, आजच्या काँग्रेसमध्ये देशभक्तीची भावना संपली आहे. आजच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचे भूत शिरले आहे. परदेशी भूमीवर काँग्रेसच्या लोकांची भाषा बघा, त्यांचा देशविरोधी अजेंडा, समाज तोडण्याच्या चर्चा, देशाच्या संस्कृतीचा अपमान करत आहे.या काँग्रेसला तुकडे-तुकडे गॅंग आणि शहरी नक्षल लोक चालवत आहे. 

त्यांनाही गणेशपूजेची अडचण आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गणेशाची मूर्ती पोलिस व्हॅनमध्ये कशी ठेवली हे आपण पाहिले.

'काँग्रेस म्हणजे लबाडी, फसवणूक आणि बेईमानी. त्यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते,मात्र आता शेतकरी कर्जमाफीसाठी वणवण भटकत आहेत. आज ती जुनी काँग्रेस राहिली नाही. आज देशात सर्वात अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. देशात सर्वात भ्रष्ट कुटुंब असेल तर ते काँग्रेसचे राजघराणे आहे.

पीएम मोदींनी महाराष्ट्रातील मागील महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. पीएम मोदींनी एमव्हीएवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संकटात ढकलल्याचा आरोप केला.महाविकास आघाडी सरकारने कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद बनवण्याऐवजी त्यांना संकटात ढकलले, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आणि भ्रष्टाचार केला.असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती