"गाजराची पुंगी वाजली तर वाजली, म्हणत काहीजण मार्केटिंग करायला आले आहेत. असे भोंगेधारी आणि पुंगीधारी खूप बघितले आहेत. आधी मराठी आणि आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करत त्यांचे माकडचाळे सुरू आहेत, हे न समजायला देशातील जनता मूर्ख नाही," अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली.उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर नाव न घेता सडेतोड शब्दांत टीका केली.
"नव्या हिंदुत्त्वाच्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या कोणत्या मैदानात कोण-कोणते खेळ करतात, हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात नाटक-सिनेमा वगैरे सगळं बंद होतं. त्यामुळे फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?"
ते पुढे म्हणाले, "शिवसेना हा हिंदुत्त्ववादी पक्षच आहे. ते लपवण्याची गरजही नाही. शिवाय, मी हे विधानसभेतही सांगितलेलं आहे. पण तरीही तीन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष इतक्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, याचं सर्वांना आश्चर्य वाटतं."
"राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपची 'बी' टीम नव्हे तर 'ढ' टीम आहे," अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे."मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो. तसेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत," असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं.