चिपी विमानतळाच्या उद्धाटनाला मुख्यमंत्री येणार का ?

गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (08:58 IST)
सिंधुदुर्गातील बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला होणार आहे. केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. 
 
नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख जाहीर केली. यावेळी त्यांना या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावणार का? असा प्रश्‍न नारायण राणे यांना विचारले असता त्यांनी ‘उद्घाटनाला मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही’ असं उत्तर दिलं. यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.
 
सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात चिपी विमानतळाच्या उद्धाटनाच्या श्रेयाची लढाई सुरु आहे. नारायण राणे यांनी आपल्या प्रयत्नामुळे चिपी विमानतळ सुरु होत असल्याचा दावा केला. यावर विनायक राऊत यांनी पलटवार केला. आयत्या बिळावर नागोबा होऊन राणेंना विमानतळाचं श्रेय घेता येणार नाही, अशी सरळ टीका विनायक राऊत यांनी राणेंवर केली.
 
या विमानतळाचं उद्घाटन जरी केंद्र सरकारकडून होत असेल, तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना औपचारिक पत्र पाठवावं लागतं. निमंत्रण पत्रिकेतही राज्याचे मुख्यमंत्री, स्थानिक खासदार आणि आमदारांचे नाव असावं लागतं. मुख्यमंत्री आणि इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही हा त्यांचा प्रश्न असतो. केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावणं बंधनकारक नाही आहे. एखाद्या कार्यक्रमाला जर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती येत असतील तर मात्र मुख्यमंत्र्यांना बोलावणं बंधनकारक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती