अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं होतं, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं होतं. तेव्हापासून मुख्यमंत्रीबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी प्रसरमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते असून तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील.
फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्री बदलाच्या अफवांचं खंडण केलं. तसेच त्यांनी अजित पवारांबरोबर काय चर्चा झाली आहे तेदेखील स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतल्या प्रवेशाआधी भाजपाची अजित पवारांबरोबर काय-काय बोलणी झाली होती. त्यातल्या काही गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अधिकृतपणे सांगतो की या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. दुसरा कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही. यासंदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनात पूर्ण स्पष्टता आहे. ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली, त्यावेळीही अजितदादांना स्पष्टपणे कल्पना देण्यात आली आहे, ती त्यांनी स्वीकारली आहे. केवळ स्वीकारलीच आहे असं नाही तर त्यांनी स्वतः आपल्या वक्तव्यात देखील स्पष्टपणे सांगितली आहे. तसेच मुख्यमंत्रीबदलाची कुठलीच चर्चा नाही हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशी चर्चा करण्याचं कारण नाही.