हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या मागणीसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ फ्रान्समधील पॅरिस येथे पोहोचले आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने 'मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया' या थीम अंतर्गत युनेस्कोला प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावात 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, या प्रस्तावात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग,खांदेरी आणि तामिळनाडूमधी जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, युनेस्कोच्या दर्जासाठी राज्याची बाजू मांडण्यासाठी एक शिष्टमंडळ शनिवारी पॅरिसला रवाना झाले.
ते म्हणाले, “जर युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला तर पर्यटनाच्या चांगल्या संवर्धन आणि विकासाचे मार्ग मोकळे होतील. यामुळे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यास आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती देताना मंत्री शेलार यांनी लिहिले की, "महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून, पॅरिसमधील इंडिया हाऊस येथे युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा, जे जागतिक वारसा समितीचे सदस्य देखील आहेत, यांची भेट घेतली आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या12 किल्ल्यांचा समावेश करण्याचा आमचा प्रस्ताव पुढे नेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली."