देवी सरस्वती विषयी पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळ यांनी आता याविषयी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, मी सरस्वतीला शिव्या दिल्या नाहीत, ज्यांना कोणाला सरस्वतीचे पूजन करावयाचे असेल त्यांनी ते आपल्या घरात करावे, शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरुषांचे कार्य मुलांसमोर ठेवावे, असे वक्तव्य माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
भुजबळ यांनी यापूर्वीही सरस्वती पूजनासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही आपल्या कार्यालयात सरस्वती पूजनाचा कार्यक्रम घ्यावा लागला होता. काल पुन्हा भुजबळ यांनी सरस्वती पूजनाचा मुद्दा छेडला. ज्यांना कोणाला सरस्वती पूजन करावयाचे असेल त्यांनी ते आपल्या घरात करावे. समता परिषदेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हा विचार मांडला. माझ्या वक्तव्याने कोणाला राग यायचे कारण नाही. दीडशे वर्षांपूर्वी ब्राम्हण महिलांनाही शिकण्याच्या अधिकार नव्हता. ब्राम्हण घरातील केवळ पुरुषांनीच शिकले पाहिजे का, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडे वाड्यात पहिली शाळा काढली. त्यावेळी ब्राम्हण समाजातील चिपळूणकर, भांडारकर, भिडे हेही फुले यांच्या सोबत होते. या शाळेत पहिल्या सहा मुली आल्या त्या ब्राम्हण समाजातील होत्या. आज ब्राह्मणच नाही तर सर्वच समाजातील मुली शिकत आहेत. नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक मंडळ सुरु झाले ठेवा अनंत अडचणी आल्या. त्यावेळी स्वतः शाहू महाराज नाशिकला आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सौभाग्यवतीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून रयत शिक्षण संस्था सुरु केली. आज या संस्थांमधून हजरो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पूजाच करायची असेल तर या महापुरुषांची करा, असेही भुजबळ म्हणाले.