केंद्रीय आरोग्य पथकाने मागील तीन दिवसात शहर व ग्रामीण भागातील कोविड सेंटर, लसीकरण केंद्र, आरटीपीसीआर तपासणी, गृहविलगीकरणाचा प्रोटोकॉल कंटेन्मेंट झोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रुग्णांसाठी असलेल्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हयात कोविड नियंत्रणासाठी तपासण्यांवर विशेष भर देण्यात आला असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्याच्या तपासण्या मोठया प्रमाणात करण्यात येत आहेत.
ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण आढळून आले आहेत. अशा भागात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्याला विशेष प्राधान्य देण्याची शिफारस केंद्रीय पथकाने केली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी तसेच विविध संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांना प्रशासनातर्फे तांत्रिक व आवश्यक मदत करण्यात यावी. नागपूर शहरात वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात यावे. कोविडच्या तपासण्यासंदर्भात आयसीएमआरच्या पोर्टलवर दररोज माहिती भरण्यात यावी. ही माहिती नियमित अद्ययावत करण्यात यावी. त्यासोबत आयसोलेशन बेडच्या संख्येत वाढ करण्यात यावी. यासाठी आवश्यक मनुष्यबळ करुन देण्यास प्राधान्य असावे. लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. लसीकरण करतांना लस वाया जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.
कोविड महामारीचा सामना करताना मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन तसेच महानगर पालिका प्रशासन कोविड नियंत्रणासाठी विशेष तज्ञ व एमबीबीएस डॉक्टरांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दयावे. कोविड रुग्णालयामध्ये डॉक्टर व सहाय्यक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा परिणामकारक कशा ठरतील याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपरुग्णालय येथेही आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आयसोलेशन 6 हजार 506 तर 2 हजार 26 आयसीयू बेड आहेत. या बेडसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा याबाबतही केंद्रीय आरोग्य पथकाकडून प्रशासनाला आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रारंभी जिल्हाधिकारी ठाकरे म्हणाले, जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता त्या अनुषंगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या व उपलब्ध बेड्स लक्षात घेता अमरावती येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काही रुग्णांना उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य पथकाने केलेल्या सूचनांनुसार आवश्यक बदल करुन यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न असेल, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.