ठाणे-भिवंडी रस्ता आठ पदरी करण्याच्या एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी मंजुरी दिली. मंगळवारी मंजूर झालेल्या योजनांत औरंगाबाद-जळगाव-जालना मार्गाचाही समावेश आहे. सातारा-कागल रस्ता सहापदरी करण्याच्या तीन हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही त्यांनी मान्यत दिली आहे.
महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करताना गडकरी यांनी स्पष्ट केले की ठाणे-भिवंडी आठपदरी रस्त्याच्या निविदा काढण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल व तीन महिन्यांत कामाला प्रारंभही होईल. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मदन एरावार, खासदार संजय धोत्रे, धनंजय महाडिक, चंद्रकांत खैरे, संजय जाधव, श्रीरंग वारणे, श्रीकांत शिंदे, राजीव सातव आणि मंत्रालय सचिव युद्धवीर सिंह मलिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, कल्याण-ठाणे-मुंबई जलमार्गासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रारंभी ५०० कोटी रुपयांची निविदा काढली जाईल. या कामासाठी केंद्र आणि महापालिका एक-एक हजार कोटी रुपये खर्च करतील.