मागील आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रात खास करून मुंबई येथे कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईबरोबर कर्नाटकाचा संपर्क अधिक असल्यामुळे सीमेवरील जिल्हय़ात सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या विजापूर जिल्हय़ात सुमारे 11 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. बेळगाव जिल्हय़ातही मोक्मयाच्या ठिकाणी चेकपोस्ट आहेत. तपासणीमुळे प्रवाशांना थोडय़ा प्रमाणात त्रास झाला तरी बेळगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशी तपासणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीमेवर आणखी तपासणी वाढविण्यात येणार आहे.
कोरोना थोपविण्याबरोबरच त्याचा समर्थपणे सामना करण्यासाठी तयारी सुरू आहे. दुसऱया लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासली. यावेळी ही कमतरता भासू नये म्हणून ऑक्सिजन पुरवठा करणाऱया कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा व तालुका इस्पितळात ऑक्सिजन प्लांट तयार ठेवण्यात आले आहेत. अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात 4 हजार आयसीयु बेड तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी औषध पुरवठय़ाचीही व्यवस्था आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.