लहान मुलाकडे सापडली तब्बल साडेसहा लाख रुपयांची रोकड

सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:10 IST)
सात वर्षांच्या चिमुकल्याच्या बॅगेत तब्बल साडेसहा लाख रुपयांची रोकड सापडली. वैतरणा रेल्वे स्थानकात रात्री पावणेनऊच्या सुमारास एक सात वर्षांचा मुलगा असहाय्य अवस्थेत उभा होता. त्यावेळी विरारला रात्रपाळीला कामाला जाणार्‍या तुषार पाटील या तरुणाची त्याच्यावर नजर गेली. त्याने विचारपूस केल्यावर त्याचे नासीर असे नाव असल्याचे समजले. तसेच, त्याची वडिलांशी चुकामुक झाल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे तुषारने सहप्रवासी मनीष रेकटे याच्या मदतीने नासीरकडील बॅगेची तपासणी केली असता, ती पैशाने भरलेली दिसून आली. त्यामुळे या मुलाला वसईरोड लोहमार्ग पोलिसांकडे ते दोघे घेऊन गेले.
 
पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो नालासोपारा पूर्वेकडील रेहमतनगरात राहत असल्याचे त्याने सांगितले. त्याआधारे पोलिसांनी त्याच्या घरच्या पत्यावर निरोप पाठवला. दरम्यान, नासीरचे वडील शब्बीर खान त्याला शोधत रेल्वे पोलीसांकडे गेले. त्यावेळी मुलाची आणि त्याची भेट झाली. केटरींगच्या व्यवसायातून मिळालेले 6 लाख 48 हजार 640 रुपये घेऊन वांद्रेहून नालासोपारातील घरी डहाणू लोकलने नासीर आणि मी निघालो होतो. ते पैसे नासीरच्या बॅगेत ठेवले होते. गर्दीमुळे विरारला मी कसाबसा उतरलो. मात्र, नासीर गाडीतच राहिला, असे स्पष्टीकरण शब्बीरने दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती