राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा दाखल, लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका; काय आहे प्रकरण?

सोमवार, 4 डिसेंबर 2023 (19:48 IST)
सांगली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल 150 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन करत तोडफोड केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.
 
दोन दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्यावर ऊस दरासाठी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि ऊस दरासाठी आंदोलनावरुन १० तास कारखाना बंद पाडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा सुद्धा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.
 
राजू शेट्टी यांच्यासह 150 जणांवर तोडफोडीचा तसेच लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या मागणीसाठी जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यावर आंदोलन केलं होतं.
 
वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत आपल्या राजू शेट्टी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह ठाण मांडून होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कारखाना 10 तास बंद पाडून नुकसान केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.
 
आंदोलनाच्या १० तासांच्या काळात कारखान्याचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने गाळप बंद पाडले. ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार तसेच कारखान्याचे साखर, इथेनॉल उत्पादन, डिस्टिलरी व को-जनरेशन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान केले, असा आरोप राजू शेट्टी यांच्यावर करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी कारखान्याचे सचिव दिलीप महादेव पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून राजू शेट्टी, भागवत जाधव, महेश खराडे, संदीप राजोबा, अॅड. शमशुद्दीन संदे, रविकिरण माने, संतोष शेळके, राजेंद्र माने, स्वास्तिक पाटील, सूर्यकांत मोरे, काशीनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील यांच्यासह 150 जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती