परंतु त्यासाठी देखील त्यांना सव्वा दोन –अडीच वर्षे थांबावं लागेल : भुजबळ

शुक्रवार, 18 मार्च 2022 (15:17 IST)
महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजपा सरकार पहायला मिळेल असा विश्वास नागपुर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.  यावर आज राज्याचे अन्न व नागरीप पुरवठामंक्षत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “त्यांना म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु त्यासाठी देखील त्यांना सव्वा दोन – अडीच वर्षे थांबावं लागेल. जेव्हा निवडणुका होतील तेव्हाच सरकार येईल ना? मात्र आता तरी सध्या तसं काही चित्र दिसत नाही. चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी उत्तर प्रदेशमध्ये ५० पेक्षा जास्त त्यांचे(भाजपा) आमदार कमी झालेले आहेत.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
 
तसेच, ओबीसी आरक्षणासाठी नेमकेला बांठिया आयोग पुढील दोन महिन्यात काम पूर्ण करेल. असा विश्वास यावेळी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
 
“ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बांठिया आयोग आम्ही नेमलेला आहे. हे बांठिया भारताचे जनगणना आयुक्त होते, शिवाय या राज्याचे ते मुख्य सचिव देखील होते. त्यांच्या ताबडतोब बैठका सुरू झालेल्या आहेत, सहा-सात तास ते एकत्र बसतात. त्यासाठी त्यांची व्यवस्था देखील आपण करून दिलेली आहे. याचबरोबर त्यांना एक आयएएस अधिकारी सचिव म्हणून दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दोन-तीन महिन्यात ते हे काम पूर्ण करू शकतील.” अशी माहिती भुजबळांनी माध्यामांना दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती