गद्दारांनी घात केला नसता तर महाराष्ट्राचा जगात नावलौकिक झाला असता. तसेच आपला लढा हा निव्वळ मोदींचा विरोध करण्यासाठी नसून लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उध्दव ठाकरे यांची आज हिंगोलीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर निशाणा साधताना टीका केली. तसेच राज्यात दुष्काळ असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर होते. जपान सोडा गुजरातला गेलेले उद्योगधंदे आधी महाराष्ट्रात आणा अशी खोचक टिकाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
आपल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुरवातीलाच संतोष बांगर याच्यावर निशाणा साधताना ज्या नागाची पुजा केली तोच नाग डसायला लागला असल्याची सडकून टिका केली. ते म्हणाले, “मी हिंगोलीत गद्दारांसाठी आलेलो नाही. ज्या गद्दाराला नाग समजून पूजा केली तोच नाग उलटा फिरून डसायला लागला.” अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांच्यावर केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “काहीजणांना मी गद्दारांवर बोलेन अशी अपेक्षा असेल. पण, गद्दारांवर माझा वेळ घालवणार नसून मी हिंगोलीत फक्त शिवसैनिकांसाठी आलोय…गद्दांरासाठी नाही.” असे म्हटले आहे.
भाजप सरकारवर टिका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देशातील खासदारांनी भिती व्यक्त केली आहे की, राममंदिराच्या उद्घाटनाला देशातून अनेक हिंदुत्ववाद्यांना आयोध्येत बोलावले जाणार आहे. आणि त्यानंतर देशात विविध दंगे घडवले जाणार आहे. देशाची महत्वपुर्ण माहीती देणाऱ्या कुरूलकरांची चौकशी का होत नाही ? सरकार कुलभुषण जाधव यांच्याबाबत गप्प का ?” असा सवालही त्यांनी भाजप सरकारला विचारला. तसेच आमचा लढा नरेंद्र मोदी विरोधात नसून लोकशाही टिकवण्यासाठी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.