जळगावचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. या फोनमुळे पोलीस दलात एकच धावपळ उडाली.बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्ष आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली. अज्ञात व्यक्तीने फोन करून दिलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला आहे. या घटनेची बातमी जळगावमध्ये वाऱ्यासारखी परसली असून नागरिकांनी संपर्क कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य़ ओळखून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन फोन आला होता. त्या क्रमकाची माहिती काढण्यात येत आहे. पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता कोणतीही बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे सांगण्यात आले. अफवा पसरवून पोलीस दलाला वेठीस धरणाऱ्या संबंधीत व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.