लातूर : राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून यात एका वर्षात २ वेळा बोर्डाच्या परीक्षा व बारावीच्या इयत्तेत सेमिस्टर प्रणाली लागू करण्यात येणार आहे शिवाय, इतरही बदल करण्यात आले असून या धोरणाचे मराठवाडा पालक संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात बदल सुचवले आहेत. या मसुद्यात वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था, कपडे, भाषा व संस्कृतीशी संबंधित इतर विषयांवरही प्रस्ताव देण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांच्या विकासावर भर देण्यात आला असून संतुलित आहार, पारंपारिक खेळ, योगासने याद्वारे मुलांच्या नैतिक विकासावर भर देण्यात येणार आहे. शैक्षणिक संरचनेतही बदल करण्यात आले आहेत.
अकरावी आणि बारावीमध्ये वर्षअखेरीस एका परीक्षेऐवजी मॉड्युलर बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा व दोन्ही सेमिस्टरचे गुण एकत्र करून मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. या शैक्षणिक धोरणाचे स्वागत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी आभार मानले आहेत.