चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. तथापि, महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजपा सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली, मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थींनींची निम्मी फी भरली व त्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली, मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.