नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने निलंबन केल्यानंतर सत्यजित तांबे यांना कुठल्या पक्षाचा पाठिंबा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तर, दुसरीकडे त्यांच्याविरोधात लढणाऱ्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना माहाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे"
ते पुढे म्हणाले की, "भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला. सत्यजित तांबे हे तरुण आहेत, तसेच हा निर्णयही कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाला आहे. सत्यजित तांबे हे होतकरू नेते असून त्यांना संधी मिळालीच पाहिजे. म्हणूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि आता भाजपने पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होणार असून कोण बाजी मारतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.