कोकणातील तौक्ते नुकसानग्रस्तांसाठी भाजपकडून ‘फिफ्थ पिलर’ उपक्रम

मंगळवार, 25 मे 2021 (10:02 IST)
निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने कोकणवासीयांचे मोठे नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची मदत अजूनही कोकणातील काही नागरिकांना मिळाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दौऱ्यादरम्यान समोर आले आहे. यासाठी कोकणावासीयांना पूर्ण मदत मिळण्यासाठी भाजपकडून ‘फिफ्थ पिलर’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. तौक्ते चक्रीवादाळात ज्या नागिराकंचे नुकसान झाले आहे त्या नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन मदत मिळाली आहे की नाही या माहितीच्या आधारे नुकसानग्रस्ताला मदत करण्यात येणार आहे.
 
निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची योग्य मदत कोकणवासियांना प्राप्त व्हावी, या हेतूने भाजपातर्फे ‘फिफ्थ पिलर’ या उपक्रमाचा प्रारंभ आज करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते. या चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झाले, पण, त्यांना भरपाई मिळालेली नाही, नुकसान झाले पण, पंचनामाच झाला नाही किंवा पंचमाना झाला पण, तो योग्यप्रकारे झालेला नाही, याची माहिती त्यांना या फेसबुक आणि युट्युब माध्यमावर मांडता येईल. यातून संकलित होणार्‍या माहितीतून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. असे ट्विट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
 
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण दौरा करुन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आहे. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. यामुळे कोकणातील नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करावी अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली आहे. कोकणातील मच्छिमार बांधवांच्या बोटी फुटल्या आहेत. आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना तात्काळ भरीव मदत करुन दिलासा देण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान मागील निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्यामुळे सरकारवर टीका देखील फडणवीसांनी केली आहे. शिवसेनेला कोकणवासीयांनी खूप दिले परंतु मदतीच्या वेळी शिवसेनेचा हात आखडता येत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती