वेदांता-फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केल्यांनतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हल्लबोल केल्यांनतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका करत महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल शिंदे-फडणवीस माफी मागतील का? असा प्रश्न माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विचारला आहे.
जयंत पाटील म्हणाले, “गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजपा गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का?”
“वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अठ्ठावन्न हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे,” असा आरोप जयंत पाटलांनी केला.